अरुण गवळीला जामीन अर्ज मंजूर
-
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या २००७ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल १७ वर्षे तुरुंगात आणि शिक्षेविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अपिलाची रखडलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र त्याच वेळी गवळीला शिक्षेतील सवलतीचा लाभ देण्याचा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपाठीने दिलेल्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपिलावरील सुनावणीही सुरू राहणार आहे. गवळी तूर्त तुरुंगातून बाहेर आला आहे. मात्र जोपर्यंत शिक्षेविरुद्ध केलेल्या अपिलाचा निर्णय येत नाही वा शिक्षेतील सवलतीबाबतही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत गवळीवरील तुरुंगाची टांगती तलवार कायम आहे
