मुंबईकरांसाठी ‘लोकल’च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक

मुंबईतील मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीची महत्त्वाची बैठक घेऊन मुंबईतील लोकल ट्रेन व गर्दीसंदर्भाने चर्चा केली.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील (Mumbai) आजच्या लोकल दुर्घटनेनं मुंबईकरांच्या जीवाचा प्रश्न नव्याने चिंतेत आला आहे. मुंबई, मुंबई लोकल (Local) आणि गर्दी यावर उपायसंदर्भात चर्चा घडत आहेत. मुंबईत दररोज 7 प्रवासी लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आलं आहे. त्यातच, आज मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेत 13 प्रवासी ट्रेनमधून पडले असून 4 जणांनी आपला जीव गमावल्याने राजकीय नेते व प्रवासी संघटनाही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या दुर्घटनेवर प्रतक्रिया देताना, बंद दरवाजाच्या लोकलचा पर्याय सूचवला आहे. तर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बंद दरवाजाच्या लोकल पर्याय नसून त्याने जीव गुदमरुन लोकं मरतील, असेही त्यांनी म्हटलं. त्याच, अनुषंगाने आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini vaishnav) यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील लोकल ट्रेनच्या अनुषंगाने चर्चा केली.